70 वर्षीय व्यावसायिकाऐवजी 45 वर्षीय व्यक्तीला तुरुंगवास, 84 दिवसांनी बाहेर आल्यावर घटना उघडकीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फसवणुकीच्या गुन्ह्यात 70 वर्षीय व्यक्तीच्या जागी एका 45 वर्षीय निरपराध व्यक्तीला तुरुंगवास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये हि घटना घडली असून 84 दिवसांच्या तुरुंगवासानंतर जामिनावर बाहेर आलेल्या 45 वर्षीय व्यक्तीने मला विनाकारण तुरुंगात टाकल्याचा आरोप केला आहे.

कोमल पांडे नावाच्या व्यक्तीने जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांच्याकडे केलेल्या तक्रारीत हा दावा केला आहे. कोमलने म्हटले आहे की, तुरुंग अधिकाऱ्यांनी मी दोषी नसल्याच्या याचिकेकडे लक्ष दिले नाही. यानंतर आता ही चूक नेमकी कशी झाली याचा शोध घेण्यासाठी जबलपूर पोलिसांनी सिटी एसपीकडे तपासाची जबाबदारी सोपवली आहे.

कोमल पांडे यांच्या तक्रारीनुसार, कान्हा रिझर्व्ह पार्कजवळ टोलवसुलीचे कंत्राट घेतलेल्या अमित खांपारिया नावाच्या स्थानिक व्यावसायिकाची जादा टोल आकारणी आणि पावतीचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी अमित, त्याचे वडील आणि इतर अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे न्यायालयाने अमित, त्याचे वडील आणि तिसऱ्या आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.

पांडेचा आरोप आहे की, 15 सप्टेंबर 2021 रोजी आरोपी अमितने त्याला आणि इतर तीन-चार जणांना मंडला जिल्हा न्यायालयात नेले आणि काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. यानंतर 22 सप्टेंबर 2021 रोजी अमितचे लोक त्याला पुन्हा कोर्टात घेऊन गेले आणि अमितचे वडील अनिरुद्ध खांपारिया यांच्या नावावर सही करून घेतली. यानंतर पोलिसांनी पांडेला आणि इतर दोघांना दुसऱ्याच्याच नावावर तुरुंगात नेले.

कोमल पांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, मला न्याय हवा आहे. मी 45 वर्षांचा आहे आणि आरोपी 70 वर्षांचा आहे, असे तुरुंग प्रशासनाला सांगत राहिलो, पण कोणीही माझे ऐकले नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी तणावाखाली होतो, त्यामुळे मी तक्रार दाखल करण्यास वेळ मारून नेल्याचेही त्यांनी सांगितले. मला न्याय हवा आहे आणि मी निर्दोष असल्यामुळे मला स्वतःला निर्दोष ठरवायचे आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने आरोपी अमितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्याशी संपर्क झाला नाही. जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी सांगितले की, तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. बर्गी सीएसपी आयपीएस प्रियंका शुक्ला यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. तपास अधिकारी IPS प्रियंका शुक्ला यांनी सांगितले की, आम्ही मंडला न्यायालयाकडून काही कागदपत्रे मागितली आहेत. तक्रारीत नाव असलेल्या इतर दोन व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र ते हजर झाले नाहीत. आम्ही पुन्हा नोटीस बजावली आहे. तक्रारदाराचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आमचा पुढील तपास सुरू आहे.