
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची घरांसाठी पात्रतानिश्चिती करण्यासाठी म्हाडाने सुरू केलेल्या विशेष अभियानाला दिलेली मुदतवाढ रविवार, 14 जानेवारी रोजी संपत आहे. आतापर्यंत 1,03, 190 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी अर्ज सादर केले असून अजूनही 47 हजार जणांची कागदपत्रे सादर होणे बाकी आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बृहन्मुंबईतील 58 बंद पडलेल्या गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रतानिश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे 14 सप्टेंबरपासून विशेष अभियान सुरू आहे. या अभियानाला 14 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय डिसेंबरमध्ये घेतला होता. मात्र अजूनही 47 हजार गिरणी कामगार अर्ज सादर करू शकले नाहीत.
– कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी अनेकदा गिरण्यांच्या कार्यालयात खेटा माराव्या लागतात. अनेकदा सर्व्हर बंद असतो. त्यामुळे अभियानाला मुदतवाढ द्यावी अशी गिरणी कामगारांची मागणी आहे.
– अभियानाच्या मुदतवाढीसाठी उपमुख्य अधिकारी, गिरणी मुंबई मंडळ यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.



























































