
सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर
उदगाव (ता. शिरोळ) येथे जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 5 जणांना अटक करण्यात आली. तर 35 हजार रोख रक्कम, 3 मोटार सायकल, टेबल, खुर्च्या, फॅन, 3 मोबाईल संच असे 1 लाख 62 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
बुकी मालक गजबर गुंडा मुलाणी (वय 42), एजंट अस्लम गुंडा मुलाणी (वय 32, दोघेही रा. उदगाव), विजय बापूसो सर्वेदे (वय 42), भरत पायगोंडा पाटील (वय 32), राजगोंडा श्रीरंग खांडेकर (वय 39, सर्व रा. अंकली) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उदगांव येथे मटका अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उदगाव बसस्थानकानजीकच्या अड्ड्यावर छापा टाकला. एजंटाकडून वसुली सुरु असताना पोलिसांनी 5 जणांना रंगेहाथ पकडले.
दरम्यान, जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये मटका, जुगार, क्लब यासह अवैध धंदे चालू देणार नाही. अवैधधंदे सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
































































