
सामना ऑनलाईन, मुंबई
गणेश चतुर्थीपासून सलग पाच दिवस विघ्नहर्त्या गणेशाची मनोभावे पुजाअर्चा व सेवा केल्यानंतर हजारो गणेशभक्तांनी मोठय़ा उत्साहात, भावपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रूपूर्ण निरोप दिला आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशी विनवणी केली. गणेशासोबतच गौरींचेही विसर्जन करण्यात आले.
पालिका प्रशासनाने, गिरगाव, जुहू, माहीम, दादर, वर्सोवा, मढ, मनोरी आदी चौपटय़ांच्या ठिकाणी, शिवाजी, सायन तलाव आदी 69 नैसर्गिक विसर्जनस्थळी आणि 31कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश व गौरी विसर्जनाची जय्यत तयारी केली होती.
महापालिकेतर्फे चौपाटय़ांवर 58 नियंत्रण कक्ष, 607 जीवरक्षक, 81 मोटरबोट, 74 प्रथमोपचार केंद्र, 60 रुग्णवाहिका, 87 स्वागत कक्ष, 118 तात्पुरती शौचालये, 201 निर्माल्य कलश, 192 निर्माल्य वाहन, 1991 फ्लड लाईट, 1306 सर्च लाईट, 48 निरीक्षण मनोरे, 50 जर्मन तराफे, 6187 कर्मचारी अशी चोख व्यवस्था करण्यात आली होती.
गतवर्षी पाच दिवसांच्या एकूण 16,436 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामध्ये सार्वजनिक 677 व घरगुती 15,759 मूर्तींचा समावेश होता.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… असे म्हणत सोमवारी भक्तांनी पाच दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप दिलाय. भक्तांच्या इच्छेखातर पुढच्या वर्षी लाडका गणराय खरंच लवकर येणार आहे. सोमवार, 2 सप्टेंबर 2019 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. म्हणजेच बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहेत. पुढच्या वर्षी गौरी विसर्जन सहाव्या दिवशी होणार आहे. म्हणजे गौराईचा मुक्काम एक दिवस वाढणार आहे. अनंत चतुर्दशी 12 सप्टेंबर 2019 रोजी आहे, म्हणजेच बाप्पाचा मुक्काम एकूण 11 दिवस आहे, अशी माहिती पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
रात्री 9 पर्यंत-
- सार्वजनिक-672
- घरगुती-41228
- गौरी-3518

























































