चीनच्या सरकारी टेलिकॉम कंपन्यांनी लाँच केली 5 जी मोबाईल सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रज्ञान क्षेत्रात सुपर पॉवर होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या चीनने शुक्रवारी देशातील 40 शहरांत एकाच वेळी 5 जी मोबाईलसेवा सुरु करण्याचा पराक्रम केला. त्यामुळे असे हायटेक मोबाईल तंत्रज्ञान पुरवणारा जगातला चौथा देश म्हणून चीनच्या नावाची नोंद झाली आहे. याआधी इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांनी याच वर्षी या सेवेचे जाळे मोबाईल ग्राहकांना पुरवले होते. नव्या 5 जी सेवेचा डाऊनलोडींगचा वेग या आधीच्या 4 जी नेटवर्कपेक्षा 10 ते 100 टक्के अधिक आहे. त्यामुळे ही सेवा नव्या पिढीची हायटेक सुविधा म्हणून ओळखली जाणार आहे.

कम्युनिस्ट चीनच्या चायना मोबाईल ,चायना युनिकॉम आणि चायना टेलिकॉम या सरकारी कंपन्यांनी चीनच्या 40 शहरांत 5 जी मोबाईल सेवा ग्राहकांसाठी सुरु केली. विशेष म्हणजे चिनी 5 जी सेवेचे मासिक भाडे सुमारे 1,289 ते 6,030 असे ग्राहकांना परवडणारे असेल. शिवाय थोडे अधिक पैसे खर्च करुन ग्राहक अधिक वेगवान मोबईल सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. 5 जी सेवेचा वापर चालकरहित कारमधेही करता येईल असे चिनी मोबाईल कंपन्यांचे म्हणणे आहे.

चीनने यंदा वर्ष अखेरीपर्यंत 5 जी मोबाईल सेवा चीनच्या 1 कोटी 70 लाख ग्राहकांपर्यंत निर्णयाचे उद्दिष्ट ठेवले आहे. चिनी मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आतापर्यंत 5 जी सेवा देऊ शकणारे 18 प्रकारचे मोबाईल हँडसेट बाजारात आणले आहेत. त्यांची संख्या सुमारे 7 लाख 87 हजार इतकी आहे. 2025 पर्यंत चिनी 5 जी सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 60 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणेच मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातही जगात नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट चीनने ठेवले आहे.