बीडमध्ये आणखी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह; 10 जणांना डिस्चार्ज

बीड जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असतानाच सोमवारी आणखी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 10 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या 15 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बीड शहरातील मसरतनगर येथील कंटेनमेंट झोन शिथील करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातून सोमवारी सकाळी 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यात बीड सामान्य रूग्णालयातील 10 रूग्ण होते. आष्टी ग्रामिण रूग्णालयातील 9, माजलगाव ग्रामिण रूग्णालयातील 4, स्वाराती ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालयातील 14 या रूग्णांचा त्यात समावेश होता. त्यातील 32 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील मुंबईहून आलेल्या 3 व्यक्तींचा समावेश आहे. उर्वरित 2 जण बीड शहरातील आहेत. त्यामध्ये अजीजपुरा भागातील 33 वर्षीय पुरूष संभाजीनगरातून आलेला तर दत्तनगर येथील 44 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच नव्याने 5 रूग्ण आढळल्याने त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये सोमवारी सकाळपर्यंत 20 रूग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 10 रूग्णांना सोमवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात उपचार घेणारे 10 रूग्ण असतानाच सोौमवारी त्यात नव्या 5 रूग्णांची भर पडल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या