प्लॅस्टिकची पिशवी हातात दिसल्यास पाच हजार रुपये दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली २३ जूनची मुदत संपत आली असून त्यानंतर मात्र प्लॅस्टिकची पिशवी वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्लॅस्टिकची पिशवी देणाऱया आणि घेणाऱया अशा दोघांवरही ही कारवाई केली जाणार आहे. प्लॅस्टिकची पिशवी सापडल्यास पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे.

प्लॅस्टिकच्या पिशव्या, यूज अॅण्ड थ्रो प्रकारची कटलरी, हॉटेलमधील पार्सल देण्यासाठी वापरले जाणारे कंटेनर, स्ट्रॉ, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास अशा वस्तू दुकानदारांकडून घेतल्यास किंवा वापरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशी कारवाई करण्यासाठी पालिकेने निरीक्षकांची २२५ जणांची फौज तयार केली आहे. त्यापैकी दुकाने आणि आस्थापना विभागातील १०७ निरीक्षकांची नावे पालिका प्रशासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. हे निरीक्षक दुकानदारांवर कारवाई करतील, तर मार्केट आणि परवाना विभागातील निरीक्षकांची नावेही लवकरच जाहीर केली जाणार आहेत. पालिकेच्या मंडई आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी दहा दिवस
मुंबईकरांजवळ आणि दुकानदारांजवळ असलेल्या प्रतिबंधित प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी आता अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदीची घोषणा केलेली असली तरी सध्या दुकानदारांकडे आणि मुंबईकरांकडे घराघरात असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी २३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी केली जात असताना कुणाला वेठीस धरले जाणार नाही किंवा काही गैरफायदा घेतला जाणार नाही याकरिता निरीक्षकांना वॉर्ड नेमून दिले जाणार आहेत. तसेच त्यांना विशिष्ट गणवेश दिला जाणार आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार आहे. अशाच कर्मचाऱयांना कारवाईचा अधिकार असणार आहे. २३ जूननंतर सर्वसामान्यांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये किंवा दुकानदारांकडे प्लॅस्टिकची पिशवी मागू नये. कागदी किंवा कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही आवाहन पालिका अधिकाऱयांनी केले आहे.

प्लॅस्टिक जमा करावे
अजूनही ज्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या वस्तू असतील त्यांनी आपल्या जवळच्या प्लॅस्टिक संकलन केंद्रावर ते जमा करावे तसेच सोसायटय़ांनी किंवा व्यवसायिक संघटनांनी १० किलोपेक्षा अधिक प्लॅस्टिक संकलन केलेले असल्यास १८००-२२२-३५७ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सूचना देण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. जमा केलेले प्लॅस्टिक उचलून नेण्याची व्यवस्था महापालिकेद्वारे केली जाणार आहे.

अशी होईल शिक्षा
प्लॅस्टिकची पिशवी किंवा यूज अॅण्ड थ्रो प्रकारचे वन टाइम यूज होणारे प्लॅस्टिक वापरताना, विकताना पहिल्यांदा पकडले गेल्यास ५००० रुपये, दुसऱयांदा पकडले गेल्यास १० हजार रुपये आणि तिसऱयांदा पकडले गेल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद आहे.