
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यात सुमारे 50 हजार युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.
राज्यात मागील पाच वर्षांत 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 62 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहितीही सुभाष देसाई यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे. देशातील एकूण रोजगारांपैकी 25 टक्के रोजगार निर्मिती राज्यात झाली. मराठवाडा विभागात 1 लाख 8 हजार 674 सूक्ष्म व लघु उद्योग स्थापन झाले. ज्यात 17 हजार 663 कोटी रुपये गुंतवणूक व 5 लाख 80 हजार 507 रोजगार निर्मिती झाली. विदर्भ विभागात 1 लाख 94 हजार 420 उद्योग स्थापन झाले असून 18 हजार 236 कोटी रुपये गुंतवणूक आणि 6 लाख 37 हजार 409 रोजगार निर्मिती झाली आहे, असेही ते म्हणाले. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र या दोन महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून सामंजस्य करारापैकी कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.



























































