राज्यात मागणीअभावी 50 हजार टन दूध पावडर पडून!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील दूध उत्पादक क्षेत्रापुढे अतिरिक्त दूध पावडरीचा आणि बटरचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाऊन काळात दुधाची मागणी घटल्याने सर्वच दूध संघांनी मोठय़ा प्रमाणात दूध पावडर तयार केली आहे. त्यामुळे आज राज्यातील दूध पावडरीचा साठा 50 हजार मेट्रिक टन तर बटर जवळपास 27 हजार टन आहे. तसेच दूध पावडरीचा प्रतिकिलोचा दर 160 रुपयांपर्यंत खाली घसरल्याने पावडर उत्पादक संघांची कोंडी झाली आहे.

राज्यात दररोज एक कोटी 30 लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असून लॉकडाऊनच्या आधी दुधाची दैनंदिन मागणी 1 कोटी 15 लाख लिटर एवढी होती, तर उर्वरित 15 लाख लिटर दुधाची पावडर आणि सहउत्पादने तयार केली जात होती. तेव्हा प्रतिकिलो दूध पावडरचा दर 260 रुपये होता. मात्र लॉकडाऊनमुळे दुधाच्या दैनंदिन मागणीत 30 टक्क्यांनी घट झाल्याने अतिरिक्त ठरणारे जवळपास 35 लाख लिटर दुधाचीही पावडर तयार करावी लागली आहे. त्यामुळे आज राज्यात 50 हजार मेट्रिक टन पावडर मागणीअभावी पडून असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात मुबलक दूध आणि पावडर असल्याने पावडरीचा प्रतिकिलोचा दर 260 रुपयांवरून 160-170 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट आल्यास अतिरिक्त दूध आणि पावडरीमुळे राज्यातील डेअरी व्यवसाय उद्ध्वस्त होईल अशी भीती महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक, प्रक्रिया संघाचे सरचिटणीस प्रकाश कुतवळ यांनी व्यक्त केली.

केंद्राने प्रतिकिलो पावडरीच्या निर्यातीवर अनुदान द्यावे

केंद्र सरकारने दूध पावडरीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याबरोबरच डेअरी व्यवसायाला आधार देण्यासाठी प्रतिकिलो पावडरीला 100 रुपये निर्यात अनुदान द्यावे अशी मागणी डेअरी व्यावसायिकांकडून केली जात आहे.