
>>देवेंद्र भगत
मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना करणाऱया पालिकेने आता कबुतरांपासून होणारे आजार, दुर्गंधी आणि उपद्रव रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये आता बेकायदेशीरपणे कबुतरांना चणे आणि इतर खाद्य टाकताना आढळल्यास मार्शलकडून कारवाई केली जाणार असून 100 ते 500 रुपयांपर्यंतचा दंड होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांची धूळ हे प्रमुख कारण असल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाने कठोर नियमावली करून बेजबाबदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता अनधिकृतपणे कबुतरांना खाद्य टाकणाऱयांवरही कारवाई केली जाणार आहे. मुंबईत काही ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. याशिवाय मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातही आता अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कबुतरांना चणे, डाळ असे खाद्य टाकण्यास सुरुवात करून धंदाच सुरू केल्याचे प्रकार समोर आले आहे. याचा प्रचंड उपद्रव होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून जोरदार आक्षेप घेत पालिकेकडे तक्रारी केल्या जातात, मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
दुर्गंधी, अस्वच्छता, प्रदूषण…
कबुतरांच्या विष्ठsमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामध्ये श्वसनाचे आजार असलेल्यांना त्रास सहन करावा लागतो. अस्थमा आजार असणाऱयांना याचा सर्वाधिक फटका बसतो. शिवाय कबुतरांचे थवे उडताना उडणारी धूळ, खाद्याची घाण, पिसे आणि दुर्गंधीमुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषणातही वाढ होते. याची दखल घेत पालिका आता बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य टाकणाऱयांवर कारवाई करणार आहे.
असा आहे धोका
कबुतरांच्या विष्ठsत अनेक प्रकारचे फंगस असतात. त्यामुळे या ठिकाणची स्वच्छता करताना उडणारी धूळ शरीरात गेल्यास छातीचे, खोकल्याचे आजार होतात. मेंदूमध्येही संसर्ग होऊ शकतो. फूड पॉयझनिंगचाही धोका असतो. न्यूमोनिया, ऍलर्जी, लंग फ्रायब्रोसिस असेही त्रास संभवतात. हे टाळण्यासाठी कबुतरांची व्यवस्था वस्तीपासून दूर करून त्यांची काळजी घ्यावी, असे केईएम रुग्णालयाचे माजी डीन डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.


























































