आठवडय़ात 500 ठिकाणचे निर्बंध उठवले, इमारती मोकळा श्वास घेऊ लागल्या!

मुंबईत इमारतींमध्येही आता कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली असून फक्त एकाच आठवडय़ात तब्बल 500 सील इमारतींमधील निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय झोपडपट्टय़ा-चाळींमध्येही कोरोना आटोक्यात येत असून या ठिकाणीही आठवडय़ात 32 कंटेनमेंट झोन कमी झाले आहेत. सध्या मुंबईत 9405 सील इमारती असून झोपडपट्टय़ा-चाळींमध्ये 613 कंटेनमेंट झोन आहेत.

कोरोना रोखण्यासाठी रुग्ण आढळल्यास संबंधित ठिकाणे पालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान ऑगस्टअखेर सुरू झालेली रुग्णावाढ संपूर्ण सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत कायम राहिल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले होते. 9 ऑक्टोबर रोजी 9863 सील इमारतींची संख्या 10 ऑक्टोबर रोजी 10121 वर पोहोचली. म्हणजेच केवळ एकाच दिवसांत 258 सील इमारती वाढल्या. मात्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचे चांगले परिणाम दिसू लागले असून रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे.

मुंबईत 14 लाख कोरोना चाचण्या

मुंबईत कोरोनाच्या 14 लाख 6 हजार 524 चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या आहे. यामध्ये सद्यस्थितीत दिवसभरात होणाऱया चाचण्यांची संख्या 6-7 हजारांवरून 15 ते 18 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून रुग्ण बरे होण्याचा दर 88 टक्के झाला असून कोविड वाढीचा सरासरी दर 0.64 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी झपाटय़ाने वाढतोय

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत पालिकेच्या माध्यमातून घरोघरी स्क्रिनिंग, तपासणी, सर्वेक्षण आणि जनजागृती करून कार्यवाही करण्यात येत असल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वेगाने वाढत आहे. 21 ऑक्टोबर रोजी शंभरीपार होऊन 102 दिवस झालेला रुग्ण दुपटीचा कालावधी एकाच दिवसात सहा दिवसांनी वाढून 108 झाला आहे. यामध्ये एफ-दक्षिण – 180 दिवस, जी-दक्षिण – 178 दिवस आणि ई विभागात तर रुग्ण दुपटीचा कालावधी 162 दिवस म्हणजेच दीडशेपार झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या