
मीठ आणि साखरेशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होत नाही. आपल्या रोजच्या आहारात मीठ-साखर असतेच. पण ते खाणे धोकादायक ठरू शकते. कारण मोठमोठय़ा ब्रँडच्या मीठ आणि साखरेमध्ये मायक्रोप्लॅस्टिकचे कण असल्याची धक्कादायक बाब दिसून आली आहे. तसेच 527 पदार्थांमध्ये कॅन्सर होणारी घातक रसायने आढळली आहेत. त्यामुळे आरोग्याची चिंता वाढली आहे.
सध्याच्या काळात कन्सरचे प्रमाण वाढत आहेत. यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. अशातच गेल्या वर्षी ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेने केलेला एक अभ्यास पुन्हा चर्चेत आला आहे. ‘मायक्रोप्लॅस्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर’ नावाच्या या अभ्यासात पांढरे मीठ, सेंद्रिय खडेमीठ, समुद्री मीठ आणि कच्चे मीठ यांची तपासणी केली होती. तसेच ऑनलाईन आणि बाजारपेठेमधून खरेदी करण्यात आलेल्या साखरेच्या नमुन्यांचीही तपासणी केलेली होती. संस्थेने केलेल्या अभ्यासात असे दिसून आलेय की, अनेक पदार्थांमध्ये छोटया-छोटया कणांच्या स्वरूपात मायक्रोप्लॅस्टिक आहे. त्यांचा आकार 0.1 मिमी ते 5 मिमीपर्यंत असतो. एवढंच नाही तर साखरेचे मोठे ब्रँड असो किंवा छोटो ब्रँड असो तसेच मिठाचे छोटे ब्रँड असो की मोठे ब्रँड असो याबरोबरच पॅकेज केलेले किंवा विनापॅकेजवाले ब्रँड असो, या सर्वामध्येच मायक्रोप्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. पेंद्रीय आरोग्यमंत्री आणि अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण याकडे लक्ष देणार का, असा सवाल आता केला जात आहे.
टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा म्हणाले, आम्ही केलेल्या अभ्यासामध्ये सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लॅस्टिक्स आढळून आले आहे. ही एक चिंतेची बाब असून मायक्रोप्लॅस्टिक्सचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. मीठामध्ये मायक्रोप्लॅस्टिक्सचे प्रमाण 6.71 ते 89.15 तुकडे आढळून आले आहेत आणि साखरेमध्ये 89.15 तुकडे प्रति किलोग्रॅम आढळून आले आहेत. मीठ आणि साखरेमध्ये सापडलेल प्लॅस्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करू शकतात .
गेल्या वर्षी युरोपीय संघाच्या खाद्य सुरक्षा अधिकाऱयांनी हिंदुस्थानातून येणाऱया 527 खाद्यपदार्थांमध्ये कॅन्सर निर्माण करणारी रसायने असल्याची धक्कादायक माहिती दिली होती. हिंदुस्थानातील मोठय़ा ब्रँडच्या मसाल्यांमध्ये एथिलीन ऑक्साईड नावाचे रसायन आढळले होते. सिंगापूर, हाँगकाँगसारख्या ठिकाणी ही उत्पादने बॅन करण्यात आली. युरोपीय संघाने एथिलीन ऑक्साईडसाठी 0.1 मिलिग्रॅम/ ग्रॅम एवढे प्रमाण ठेवले आहे, मात्र हिंदुस्थानातील उत्पादनांमध्ये एथिलीन ऑक्साईडचे प्रमाण यापेक्षा अधिक आढळले होते.

























































