आपचे 55 आमदार म्हणतात केजरीवालांनी तुरुंगातून सरकार चालवावे

अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये. तुरुंगातून सरकार चालवावे, दिल्लीची 2 कोटी जनता त्यांच्या पाठीशी आहे असे आपच्या 55 आमदारांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेत त्यांना ठामपणे सांगितले. दरम्यान, 4 आमदार दिल्लीत नसल्यामुळे ते सुनीता केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत.

अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असून त्यांना 14 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आपचे नेते आणखी आक्रमक झाले. दिल्लीच्या मंत्री अतिशी मार्लेना यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधण्यात आला. मी पक्षात आले नाही तर एक महिन्याच्या आत मला ईडीकडून अटक करण्यता येईल, अशी धमकीही देण्यात आल्याचा दावा अतिशी यांनी केला.

केजरीवाल यांची साखरेची पातळी घसरली

अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातील पहिली रात्र बराकमध्ये येरझरा करत घालवली. तुरुंग अधिकाऱयाच्या हवाल्याने पीटीआयने म्हटले आहे की, केजरीवाल रात्रभर 14 बाय 8 फूट सेलमध्ये फेऱया मारत होते. सिमेंटच्या फरशीवर ते थोडा वेळ झोपले.मंगळवारी केजरीवाल यांच्या रक्तातील पातळी घसरल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, त्यांना मधुमेह असल्याने शुगर सेंसर आणि ग्लूकोमीटर, ग्लुकोज आणि कॉफी देण्यात आले.

आणखी चार नेत्यांना अटक करण्याचे षड्यंत्र

आपच्या आणखी चार नेत्यांना अटक करण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे असा आरोप अतिशी यांनी केला. दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आधीच तुरुंगात धाडलेले आहे. भाजपा आणखी चार नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप अतिशी यांनी केला. माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांना अटक केली जाऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.