
33 कोटी वृक्षारोपणाची संकल्पना राबवणाऱ्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात 55 झाडांची कत्तल केली गेली आहे. ही झाडे प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत बांधकामात अडथळा ठरली होती. ही झाडे तोडण्याची रीतसर परवानगी महानगर पालिकेने घेतली होती. तोडण्यात येणाऱ्या 55 वृक्षांच्या मोबदल्यात 275 वृक्षांचे रोपण केले जाईल असे सांगितले जात आहे.
चंद्रपूर जिल्यात कोट्यवधी वृक्षांची लागवड केली गेली, असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र आज घडीला किती वृक्ष जिवंत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. या वृक्षतोडीवर पर्यावरण प्रेमी संताप व्यक्त करत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित आहे. या इमारतीच्या बांधकामास 51.69 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. इमारत बांधकामाच्या वास्तु मांडणी आराखड्यामध्ये 55 झाडे अडसर ठरलीत. ही झाडे तोडण्याची रीतसर परवानगी महानगरपालिकेने दिली.
सद्यस्थितीत खोदकामात येणारी 30 झाडे तोडण्यात आली आहेत. येत्या काळात उर्वरित 25 झाडे तोडण्यात येणार आहेत. तोडण्यात आलेल्या 55 झाडांऐवजी नवीन 275 झाडे परिसरात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची आवश्यक खबरदारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

























































