
लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या उद्योगधंद्यांपैकी कोरोना नियंत्रणात असलेल्या विभागातील उद्योगधंद्यांना राज्य सरकारने अंशत: परवानगी दिल्यामुळे आजपासून तब्बल ५५९ कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे गेल्या महिनाभरापासून घरी बसलेले आठ हजार कामगार पुन्हा कामावर परतल्याने राज्याचे अर्थचक्र फिरू लागले आहे. राज्य सरकारच्या परवानगीमुळे ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील कारखाने सुरू झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महिनाभर लॉकडाऊन असल्यामुळे उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र ज्या भागात कोरोना नियंत्रणात आहे अशा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये राज्य सरकारने उद्योगांना २१ एप्रिलपासून अंशत: परवानगी दिली आहे. यानुसार राज्य सरकारच्या परवानगीनंतर सुरू झालेल्या विविध प्रकारच्या कारखान्यांमध्ये ग्रामीण भागातील कारखान्यांचा समावेश जास्त प्रमाणावर आहे. मात्र कारखाना परिसरात कर्मचार्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, सोशल डिस्टंन्सचे पालन करणे अशा अटीही परवानगी देताना घालण्यात आल्या आहेत. या उद्योगातील कामगारांची ने-आण करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.
७४३२ कारखान्यांनी मागितली परवानगी
कोरोना नियंत्रणात आलेल्या भागात कारखाने सुरू करण्यास अंशत: मंजुरी दिल्यानंतर तब्बल ७४३२ कारखान्यांच्या मालकांनी परवानगी मागितल्याची माहिती राज्य सरकारकडे मागितली आहे. यापैकी दीड हजार जणांना परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. यातील ५५९ कारखाने २५ एप्रिलपासून सुरू झाले आहेत. यात पुण्यात सुरू होणार्या कारखान्यांची संख्या जास्त आहे. पुण्यातील १४१८ कारखानदारांनी आपला उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसीकडे परवानगी मागितली आहे.


























































