
चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून मृतांचा आकडा 56 वर पोहोचला आहे. वुहान या शहरातून पसरलेला हा व्हायरस आता शांघाय शहरातही पसरला असून तेथेही एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत दोन हजारहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाल्याचेही समजते.
वुहान शहरातील हुबेई या शहरात या व्हायरसचा मोठा प्रभाव असून चीन सरकारने या शहरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहे. तेथील नागरिकांच्या प्रवासावर बंदी आणली आहे. त्यामुळे कायम गजबजलेले असलेल्या या शहरातील रस्ते सुनसान पडले आहेत. सरकारने दुसऱ्या शहरात जाणाऱ्या बस व रेल्वे सेवाही थांबविल्या आहेत. या शहरात प्राण्यांच्या कत्तली थांबविल्या असून नागरिकांना फक्त भाजीपाला खाण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकारने या शहरात 10 दिवसांत 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे.
कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. हा आजार 2003 मध्ये पसरलेल्या सीव्हिअर अॅक्यूट रेसिपिरेट्री सिंड्रोम म्हणजे सार्स सारखाच धोकादायक असल्याचे मानले जाते. चीन व्यतिरिक्त कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमध्ये आढळून आले आहेत.























































