
सायकल चालवून थकवा आल्यामुळे चिमुरडी गेटजवळ बसल्याचा गैरफायदा घेत सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. उमाशंकर उल्फात सिंग परिहार (34,रा. महंमदवाडी रस्ता) असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तक्रारदार यांची 6 वर्षांची मुलगी सायकल चालवून थकल्याने सोसायटीच्या गेटजवळ बसली होती. त्यावेळी सोसायटीचा सुरक्षारक्षक असलेल्या उमाशंकरने चिमुरडीला जवळ बोलावले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. मुलगी सतत शांत राहत असल्याने आईने तिची विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाडकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


























































