डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट

नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील चार डाळिंब उत्पादक शेतकऱयांची 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी (अजित पवार गट) नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार ऊर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा (रा. श्रीगोंदा) यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयाने पकड वॉरंट काढले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाणे, सुरेश संपतराव सावरे, भाऊसाहेब रामचंद्र वाघचौरे (रा. संगमनेर) अशी फसवणूक झालेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱयाची नावे आहेत.

महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी (अजित पवार गट) नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांनी संगमनेर येथील दीपक जाधव, मधुकर ससाणे, सुरेश सावरे, भाऊसाहेब वाघचौरे या डाळिंब उत्पादक शेतकऱयांच्या शेतातील सुमारे 60 लाख रुपये किमतीचे डाळिंब खरेदी केले. या खरेदीपोटी नाहटा यांनी चार शेतकऱयांपैकी दीपक काशिनाथ जाधव (रा. संगमनेर) यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणी व्यंकनाथ यांच्या 30761641048 खात्यावरील 468957 या क्रमांकाचा 60 लाख रुपयांचा 5 एप्रिल 2023 रोजीचा धनादेश दिला. धनादेश वटविण्यासाठी दीपक जाधव यांनी बँकेत भरला असता, धनादेश बाऊन्स झाला. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱयांनी प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्याविरोधात संगमनेर येथील न्यायालयात कलम 138प्रमाणे गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा हे न्यायालयात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्याविरोधात 9 मे 2024 रोजी पकड वॉरंट जारी करीत नाहटा यांना न्यायालयात हजर करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला कळविले आहे. या पकड वॉरंटमुळे तालुक्यासह जिह्यात खळबळ उडाली आहे.

प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांनी संगमनेरमधील शेतकरी दीपक जाधव यांच्या नावाने दिलेला 60 लाखांचा धनादेश.