
पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूरस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.
समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती मदान यांनी दिली.
ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्याः नंदुरबारः शहादा- 74 व नंदुरबार- 75. धुळेः शिरपूर- 33. जळगावः चोपडा- 11 व यावल- 02. बुलढाणाः जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 व लोणार- 02. अकोलाः अकोट- 07 व बाळापूर- 01. वाशीमः कारंजा- 04. अमरावतीः धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदूर रेल्वे- 01. यवतमाळः बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 08. नांदेडः माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01. हिंगोलीः (औंढा नागनाथ)- 06. परभणीः जिंतूर- 01 व पालम- 04. नाशिकः कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17. पुणेः जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02. नगरः अकोले- 45. लातूरः अहमदपूर- 01. साताराः वाई- 01 व सातारा- 08. व कोल्हापूरः कागल- 01. एकूणः 608
असा असेल निवडणूक कार्यक्रम
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल.
ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळली
निवडणुकांमधील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) वापराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. देशात ईव्हीएमऐवजी बॅलट पेपरद्वारेच मतदान घेण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्ते ऍड. मनोहरलाल शर्मा यांनी केली होती. तथापि, त्यांच्या याचिकेत काहीच तथ्य नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंद्रेश यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.



























































