
सुमारे दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर साई मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात साईं मंदिरात तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर सात महिन्यात 64 लाख भाविकांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत येतात. दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंध असल्याने भाविकांना साई दर्शन घेता येत नव्हते. आता शिर्डीत भाविकांचा ओघ वाढला आहे. गेल्या सात महिन्यांत आलेल्या भाविकांनी साईदर्शन घेत मंदिरात भरभरून दानही दिले आहे.
साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी मंदिरात भरभरून दान दिले असून ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईं मंदिराच्या तिजोरीत जमा झाले आहे. तर 64 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले आहे.कोविड काळात लॉकडाऊनमुळे शिर्डीचे अर्थचक्र थांबले होते. परंतु कोविड काळानंतर साई मंदिर सुरू झाल्याने देशभरातील साईभक्त शिर्डीत येत असल्याने शिर्डीचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत झाले आहे.

























































