डिझेल चोरणारी टोळी जाळ्यात; सोलापुरात 7 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

पेट्रोल पंपाच्या टाकीतून डिझेल चोरणाऱया एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली असून, सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीतील सातजणांना अटक करण्यात आली आहे.

रामा पाप्या पवार, लक्ष्मण पाप्या पवार, गणेश बाळू पवार, किरण अर्जुन काळे, सचिन छगन शिंदे, शंकर गजेंद्र पवार, उद्धव बापू शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे शिवसुंदर चिलोबा एचपीसीएलचा पेट्रोल पंप आहे. येथून दोन दिवसांपूर्वी 5000 लिटर डिझेल चोरीस गेल्याची फिर्याद तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असताना कर्नाटकातील बसवकल्याण येथे संशयावरून सातजणांच्या टोळीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यांच्याजवळ ट्रकमध्ये चोरलेले डिझेल, हॅण्डपम्प, ड्रम, मोबाईल असा सुमारे 15 लाख 22 हजार 58 रुपयांचा मुद्देमाल आढळला. या चोरटय़ांनी डिझेल चोरीची कबुली दिली. ही टोळी मध्यरात्रीच्या सुमारास बंद असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन टाकीतील डिझेल पाईपच्या साहाय्याने काढत आणि ड्रम भरून घेत. चोरलेले डिझेल धाराशिव जिह्यात नेवून विकत असत.

सदरची कामगिरी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, संजय देवकर, शशिकांत कोळेकर, सुनील कुंवर, पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर, महादेव सोलंकर, वैभव सूर्यवंशी, व्यंकटेश मोरे, धीरज काकडे यांनी केली आहे.