
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमध्ये 24 जुलै रोजी 787949 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा सात महिन्यांना पुरणारा असून फेब्रुवारी 2020 पर्यंत पुरेल इतका आहे. यातच सध्या तलाव क्षेत्रात पडणाऱया जोरदार पावसामुळे तलावांत पाणीसाठा वेगाने जमा होत असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3650 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यावेळी सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर 2018 रोजी तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले हेते. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्यातून पावसाळ्यापर्यंत पुरेशा पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी पालिकेने नोक्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरू केली होती, मात्र जुलैमध्ये तलावक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे समाधानकारक पाणीसाठा जमा झाल्यामुळे 20 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात बंद करण्यात आली आहे.
– सातही तलावांत होणाऱया पावसामुळे 24 जुलै रोजी एकूण 787949 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून तलाव 54.44 टक्के भरले आहेत. गेल्या वर्षी 24 जुलै रोजी हा पाणीसाठा 81.92 टक्के होता.
24 जुलैचा पाणीसाठा
(दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा – 31435
मोडक सागर – 101951
तानसा – 124482
मध्य वैतरणा – 141617
भातसा – 363834
विहार – 16584
तुळशी – 8046
एकूण- 787949


























































