लहान मुलाला दारू पाजून लैंगिक अत्याचार, मारून खड्ड्यात फेकून दिले

सामना ऑनलाईन । कल्याण

गेल्या महिन्यात डोंबिवली येथे पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र या मुलाचा मृत्यू हा अपघाती नसून त्याचा लैंगिक छळ करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच मृत्यूपूर्वी या मुलाला गुंगीचं औषध व दारू पाजल्याचे देखील शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

२४ मे रोजी डोंबिवलीतील देसलेपाडा येथे राहणारा एक सात वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर या मुलाचा मृतदेह त्याच्या घरापासून जवळच असलेल्या बांधकामस्थळी सापडला होता. इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातून या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. सुरूवातीला असं वाटत होतं की खेळता खेळता हा मुलगा पाण्यात पडला असावा त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली होती. मात्र या मुलाच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या गुप्तांगावर जखमा असल्याचं दिसून आलंय. या जखमांमुळे पोलिसांनी मुलाचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून यामध्ये या मुलावर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलाला गुंगीचे औषध देऊन आणि दारु पाजून बेशुद्ध केले असावे आणि त्यानंतर त्याच्यावर अत्याचार करण्यात आले असावे असा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. मुलाच्या पालकांनी देखील पोलीस त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत असल्याचा आरोप केला आहे. ‘आमच्या मुलाची हत्या होऊन महिना उलटलाय पण अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. शवविच्छेदनाचे रिपोर्ट देखील आमच्यापासून लपवले जात आहेत. आमच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाले होते हे देखील आम्हाला प्रसारमाध्यमांकडून समजतंय’ असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.