मुंबईत वर्षभरात 20 हजारांहून अधिक गर्भपात; 19 वर्षांखालील मुलींमधील 716 प्रकरणांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 19 वर्षांखालील मुलींमधील 716 गर्भपातांची नोंद झाली असून, या काळात शहरात एकूण 20,950 वैद्यकीय गर्भपात (MTP) करण्यात आल्याची माहिती माहिती अधिकार (RTI) कायद्यांतर्गत समोर आली आहे. गर्भनिरोधक साधनांचा अपुरा वापर किंवा त्यांचे अपयश हे गर्भपातामागील सर्वाधिक नोंदवले गेलेले कारण असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

सामाजिक कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी गर्भपात, मातामृत्यू आणि गर्भपाताशी संबंधित मृत्यूंबाबत माहिती मागविली होती. त्याला उत्तर देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाने ही आकडेवारी उपलब्ध करून दिली.

आरटीआयमधील माहितीनुसार, 2024-25 या कालावधीत 25 ते 29 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक 7,296 गर्भपातांची नोंद झाली. त्याखालोखाल 30 ते 34 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये 5,673 गर्भपात झाले. 20 ते 24 वर्षे वयोगटात 3,314 प्रकरणे नोंदली गेली, तर 19 वर्षांखालील मुलींमधील 716 गर्भपातांची नोंद झाली आहे.

चेतन कोठारी यांनी सांगितले की, गर्भपाताची कारणे नोंदविण्यात आलेल्या 20,685 प्रकरणांपैकी तब्बल 19,495 प्रकरणांमध्ये गर्भनिरोधक साधनांचा अयोग्य किंवा अपुरा वापर अथवा त्यांचे अपयश हे कारण नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयात जनजागृती आणि समुपदेशनाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

मात्र, पालिकेतील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने या आकडेवारीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. “ही सर्व प्रकरणे केवळ गर्भनिरोधक साधनांच्या अपयशामुळेच झाली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अनेकदा महिलांना त्यांचा योग्य वापर माहित नसतो, काही वेळा सामाजिक संकोचामुळे त्या संपूर्ण माहिती देत नाहीत. त्यामुळे आरटीआयमधील नोंदी हे संपूर्ण वास्तव दर्शवतातच असे नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गर्भपातामागील इतर कारणांमध्ये गर्भवती महिलेच्या जीवाला धोका असल्याची 271 प्रकरणे, शारीरिक आरोग्यास गंभीर धोका असलेली 288 प्रकरणे, मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची 358 प्रकरणे, बलात्कारातून झालेल्या गर्भधारणेची 27 प्रकरणे, गर्भातील गंभीर विकृतीचा धोका असलेली 246 प्रकरणे आणि इतर कारणांमुळे झालेली 265 प्रकरणे यांचा समावेश आहे.

‘के’ पश्चिम विभागात सर्वाधिक गर्भपात

विभागनिहाय आकडेवारीनुसार, के-पश्चिम विभागात सर्वाधिक 3,248 गर्भपाताच्या प्रकरणांची नोंद झाली. त्यानंतर एफ-उत्तर विभागात 1,960, एस विभागात 1,650, आर-उत्तर विभागात 1,297 आणि जी-दक्षिण विभागात 1,288 प्रकरणे नोंदवली गेली.

4,226 गर्भपात नैसर्गिकरीत्या

या कालावधीत मुंबईत 4,226 नैसर्गिक गर्भपात (मिसकॅरेज) झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे.