
गेल्या साडे पाच महिन्यांपासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे आतापर्यंत 81,683 कर्मचार्यांपैकी बुधवारी 73,970 कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे 22 एप्रिलपासून एसटी सेवा पुन्हा नव्या जोमाने सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसटीच्या कर्मचार्यांचे गेले साडे पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. त्यामुळे राज्यातील विशेषत ग्रामीण भागातील जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच एसटी कामगारांच्यावरील सर्व कारवाई मागे घेण्याचे आदेश देत त्यांना येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज बुधवारी 4,888 कर्मचारी कामगिरीवर हजर झाले असून एकूण 73,970 कर्मचारी ड्यूटीवर हजर झाले आहेत.
एसटीच्या 81,683 कर्मचार्यांपैकी 73,970 कर्मचारी परतल्याने आता केवळ 7,713 कर्मचारी उरले असून त्यापैकी बहुतांश कर्मचारीही 22 एप्रिलपर्यंत ड्यूटीवर हजर होण्याची शक्यता असून एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. मुंबई सेंट्रल आगारातूनही बहुतांशी लांब पल्ल्याच्या बसफेर्या पूर्ववत सुरू करण्यात यश आले आहे. त्यामुळे गेले काही हंगाम कोरोना आणि संपामुळे वाया गेल्याने चालू उन्हाळी सुटीचा हंगाम एसटीला उत्तमप्रकारे कॅश करण्याची चांगली संधी चालून आली आहे.


























































