पगारापेक्षा इतर फायदे महत्त्वाचे! 74 टक्के कर्मचाऱ्यांचे सुरक्षिततेला प्राधान्य

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि खर्च यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांमध्ये बदल होताना दिसत आहे. पगार कमी असला तरी बहुतांश लोक दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर फायद्यांना महत्त्व देत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले. आरोग्य विमा, सेवानिवृत्ती नियोजन आणि इतर फायदे मिळत असतील तर काहीसा पगार कमी असेल तरी चालेल, असे सुमारे 74 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले. स्टाफिंग सोल्युशन्स आणि एचआर सेवा उद्योगातील कंपनी जिनियस कन्सल्टंट्सने नुकताच आपला नवीन अहवाल जारी केला. कंपनीचा अहवाल संपूर्ण हिंदुस्थानातील 1,139 कर्मचाऱ्यांच्या माहितीवर आधारित आहे. अहवालानुसार, फक्त 32 टक्के कर्मचारी सध्या काम करत असलेली कंपनी देत असलेल्या फायद्यांवर समाधानी आहेत.