78 वर्षीय निवृत्त बॅंक अधिकाऱ्याची 23 कोटींची सायबर फसवणूक, वाचा नेमकं काय घडलं?

राजधानी दिल्लीतील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याने बनावट डिजिटल अटकेला बळी पडून आपली आयुष्यभराची बचत गमावली. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी निवृत्त अधिकारी नरेश मल्होत्राच्या तीन बँक खात्यांमधून एकूण २३ कोटी रुपये चोरले. आता नरेश मल्होत्रा यांना आशा आहे की, हा अनुभव इतरांसाठी इशारा आहे.

सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तपास संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून मल्होत्रा ​​यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी फक्त एका महिन्यात त्यांच्या आयुष्यातील बचत त्यांच्या खात्यातून रिकामी केली. मल्होत्रा ​​यांनी त्यांच्या फसवणुकीची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितली. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे, फक्त एका महिन्यात सर्व काही संपले असे ते म्हणाले. माझ्या अनुभवातून इतरांना धडा मिळावा आता फक्त एवढेच मला वाटते असे ते अधिक बोलताना म्हणाले.

या सायबर फसवणूक प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (आयएफएसओ) युनिटकडून केली जात आहे. हे युनिट विशेषतः सायबर फसवणूक प्रकरण हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पोलिसांनी सांगितले की, एकूण २३ कोटी रुपयांपैकी २.६७ कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवण्यात आले आहेत.

तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “पैशांच्या व्यवहारावरून असे दिसून आले की, हे पैसे अनेक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले होते. मुख्य म्हणजे या व्यवहार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून, पैसे वेगवेगळ्या राज्यांमधून काढले गेले होते. या प्रकरणात पैशांचा व्यवहार करण्यासाठी ४,००० हून अधिक खात्यांचा वापर करण्यात आला होता.