
अवकाळी पाऊस आणि ओल्या दुष्काळामुळे कांद्याला देशात सोन्याचा भाव आला आहे. हिंदुस्थानी ग्राहकांच्या जेवणाच्या ताटातून गायब झालेल्या कांद्याचे भाव खाली आणण्यासाठी केंद्र सरकारने विदेशातून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंदाजे 12 हजार टन कांद्यापैकी 790 टन कांद्याची पहिली खेप देशात दाखल झाली. हा कांदा दिल्ली आणि आंध्र प्रदेश सरकारला 57 ते 60 रुपये किलो दराने पुरविण्यात आल्याची माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
डिसेंबरअखेरीपर्यंत आयात कांद्याचा 12 हजार टन साठा हिंदुस्थानात पोहोचेल असा सरकारचा अंदाज आहे. सरकारी मालकीच्या एमएमटीसी या आयात-निर्यात संस्थेने देशातील जनतेला जाणवणारा कांद्याचा तुटवडा पाहता परदेशातून 49,500 टन कांदा आयातीचे कंत्राट घेतले आहे. हा कांदा इजिप्त, तुर्की, अफगाणिस्तान या देशांतून मागविण्यात आला आहे.




























































