
दिल्ली पोलिसांनी रविवारी एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांशी संबंधित असलेल्या 8 संशयितांना तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. हे संशयित परदेशी हँडलर्सच्या सूचनेनुसार हिंदुस्थानात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते, असा पोलिसांना संशय आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील गारमेंट युनिट्समधून 6 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे मिझानूर रहमान, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी आहेत. तर इतर दोघांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. अटकेत असलेले काही जण बांगलादेशी नागरिक असून ते आपली ओळख लपवण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर करत होते.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 8 मोबाईल फोन आणि 16 सिमकार्ड जप्त केले आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून त्यांचे इतर साथीदार आणि डिजिटल पुराव्यांचा शोध घेतला जात आहे.
दिल्लीतील मेट्रो नेटवर्कसह विविध भागांत अलीकडच्या काळात काही प्रक्षोभक पोस्टर्स लावण्यात आली होती. या पोस्टर्समध्ये प्रक्षोभक मजकूर आणि काश्मीरचा उल्लेख होता, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने या पोस्टर्सच्या मुळापर्यंत तपास केला असता, तामिळनाडूमध्ये सक्रिय असलेल्या या नेटवर्कचा सुगावा लागला.
दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी दिल्लीत आणले जात आहे. या कटात सामील असलेले इतर संशयित, त्यांना मिळणारा निधी आणि सीमापार असलेले संबंध यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

























































