मुलाचं जावळ काढून गावी परतताना काळाचा घाला; उभ्या ट्रकला पिकअपची धडक, 5 महिलांसह 8 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 मुले आणि 5 महिलांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक प्रयागराज येथे एका मुलाचे जावळ काढून आपल्या गावी परतत होते. राष्ट्रीय महामार्ग-2 वरील डोर्मा गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता, ज्याला पिकअप चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली.

दरम्यान या भीषण अपघातात 5 महिला आणि 3 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर 27 जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींवर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.