
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये नुकत्याच झालेल्या एका लग्नाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी असणाऱ्या 82 वर्षीय वृद्धाने आपल्याहून वयाने 46 वर्षे लहान असलेल्या महिलेशी विवाह केला आहे. विशेष विवाह कायद्यानुसार कोर्टात हे लग्न पार पडले. यावेळी कोर्टाच्या परिसरात या अनोख्या जोडप्याला बघायला एकाच गर्दी जमली होती.
उज्जैनच्या वल्लभनगर येथे राहणारे हे 82 वर्षीय मदन (बदललेले नाव) हे सार्वजनिक बांधकाम विभागात सेक्शन हेड पदावर कार्यरत होते. 1999 साली ते निवृत्त झाले होते. मात्र पत्नी व मुले नसल्यामुळे ते एकटे राहत होते. त्यांनी नववधू म्हणजेच रती (बदललेले नाव) 36 वर्षीय महिला उज्जैनमधल्या शास्त्रीनगर भागात राहात होती. या महिलेचं लग्न झालं होतं, मात्र पतीचं अकाली निधन झालं होतं. रतीला पहिल्या पतीपासून एक मुलगा असून ती मुलासोबत राहात होती. मदन आणि रती यांची भेट झाल्यानंतर काही दिवसांतच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
मदन आणि रती यांचा विवाह कोर्टात होणार होता, यासाठी गेल्या शुक्रवारी रतीतिच्या नातेवाईकांसोबत कोठी इथल्या विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचली होती. अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मदन आणि रती यांचा विवाहसोहळा पाह पडला. या अनोख्या लग्नाची बातमी आधीच उत्सुकतेने चर्चिली जात होती, यामुळे नवविवाहीत जोडपं पाहण्यासाठी कोर्ट परिसरात तोबा गर्दी झाली होती. ही गर्दी पाहिल्याने नवविवाहीत जोडपं हे नाराज झालं असल्याचं कळतंय.
लग्नानंतर प्रतिक्रिया देताना मदन म्हणाले की रतीच्या पहिल्या पतीचे निधन झाल्याने ती एकाकी पडली होती. तिला कोणाचाही आधार नसल्याने आपण तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला होता. मला 28 हजार रुपये पेन्शन मिळत असून आपला खर्च यामध्ये भागू शकतो असं मदन यांनी म्हटलंय. रती हिने या लग्नाबाबत बोलताना म्हटलंय की दोघांचा एकमेकांना आधार असावा यासाठी मी हे लग्न केलं.

























































