
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 823 नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक मंजूर झाला आहे. यात कोकण (मुंबई महाप्रदेश समाविष्ट) 382, पुणे 257, नागपूर 77, नाशिक 57, छत्रपती संभाजीनगर 33 आणि अमरावतीच्या 17 प्रकल्पांचा समावेश आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेळेत अर्ज केल्याने ऑक्टोबरमध्ये 645 आणि 13 नोव्हेंबरपर्यंत 178 अशा एकूण 823 नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणी मंजूर झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 769 परवानग्या देण्यात आल्या होत्या. या वर्षी ऑक्टोबरमध्ये 1208 आणि 13 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 414 प्रकल्पांनी नोंदणी अर्ज केले होते. परंतु नोंदणीसाठीच्या कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता न केल्याने त्या सर्वांना नोंदणी क्रमांक अद्याप मिळू शकलेले नाही. दरम्यान, त्रुटींची पूर्तता करायला महारेराकडून विकासकांना सातत्याने मदत केली जाते. राज्यभरातील विकासकांच्या सहाही स्वयंविनियामक संस्थांच्या माध्यमातून महारेराचे अधिकारी आठवडय़ातून एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करतात.



























































