
1983 साली हिंदुस्थानने ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी करत विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. हिंदुस्थानी संघाच्या या भीमपराक्रमावर ’83’ नावाचा चित्रपट तयार करण्यात येत असून या चित्रपटाला दिल्ली सरकारने टॅक्स फ्री घोषित केले आहे. कबीर खान हा या चित्रपटाचा दिग्दर्शक असून रणवीर सिंग हा मुख्य भूमिकेत आहे. रणवीरने विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी यांची भूमिका ही दीपिका पदुकोणने साकारली आहे.
View this post on Instagram
24 डिसेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट ‘83′
या चित्रपटामध्ये हिंदुस्थानी संघाने बलाढ्य आणि अजेय मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या संघाला अंतिम सामन्यात कशी धूळ चारली हे दाखवण्यात आलं आहे. ‘83′ हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
होय, ही माझ्या संघाच्या भीमपराक्रमाची कहाणी!
25 जून 1983 या दिवशी हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देशाच्या क्रिकेट अध्यायातील सोनेरी पान लिहिले. अष्टपैलू कर्णधार कपिलदेव निखंज यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाच्या भीमपराक्रमाची कहाणी ‘83′ या बॉलीवूडपटाच्या रूपाने रुपेरी पडद्यावर येत आहे. मंगळवारी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. तो पाहून माजी कर्णधार कपिलदेव अतिशय भावुक झाले होते. त्यांनी ‘होय, ही माझ्या संघाच्या भीमपराक्रमाची कथा आहे’ असे अभिमानाने सांगत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला होता.
कबीर खान दिग्दर्शित ‘83′ ची पटकथा हिंदुस्थानी संघाच्या ऐतिहासिक 1983 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाभोवती फिरते. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने 25 जून 1983 रोजी विश्वचषक जिंकत सोनेरी इतिहास रचला होता. ‘क्रिकेटची पंढरी’ लॉर्ड्स मैदानावर बलढय़ वेस्ट इंडीजला पराभूत करून हिंदुस्थानी संघाने साकारलेल्या सोनेरी इतिहासाच्या स्मृती ‘83′ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा जागवल्या जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांत या चित्रपटाबाबत प्रचंड कुतूहल अन् उत्सुकता आहे.





























































