
मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या हेरिटेज इमारतीवर आता सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. या ठिकाणच्या नव्याने बांधण्यात आलेल्या आणि ब्रिटिशकालीन अशा दोन्ही इमारतींवर एकूण 84 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे संपूर्ण इमारतीची सुरक्षा मजबूत होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.
पालिका मुख्यालय हे दोन इमारतीत विभागले असून एक नवीन इमारत व एक जुनी इमारत अशी व्यवस्था आहे. जुनी इमारत ब्रिटिशकालीन असून या इमारतीत ये-जा करणाऱ्य़ांवर नजर ठेवण्यासाठी 2016 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ाचे कंत्राट संपुष्टात आल्याने संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा सद्यस्थितीत बंद पडली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ांची देखभाल-दुरुस्तीचा करार झाला नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून एकूण 84 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी कंत्राटदाराला नव्याने कंत्राट देण्यात येणार असून 77 लाख 55 हजार 514 रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे.
अशी राहणार कंत्राटदाराची जबाबदारी
- कार्यादेश दिल्यापासून सहा महिन्यांत कंत्राटदाराला यंत्रणा सुरू करावी लागणार आहे.
- यंत्रणा सुरू करण्यास विलंब झाल्यास प्रत्येक आठवडय़ात कंत्राट रकमेच्या एक टक्का दंड
- कॅमेरे बंद झाल्यास कंत्राटदाराने तक्रारीचे निवारण न केल्यास किमान 500 ते कमाल 2000 रुपये दंड.





























































