
शिरोळ विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी 25 उमेदवारापैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात नऊ उमेदवार असले तरी प्रत्यक्षात लढत चौरंगी होईल असे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचे प्रमुख दिलीपराव पाटील , भाजपाचे जि.प.सदस्य राजवर्धन निंबाळकर , शेतमजूर संघटनेचे सुरेश सासणे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विजय राऊत , ताराराणी पक्षाच्या अर्चना संकपाळ , आरपीआय आठवले गटाचे अरुण कडाळे यांचा समावेश आहे. तर निवडणूक रिंगणातील मातबरामध्ये शिवसेनेचे उल्हास पाटील , जनसुराज्यचे अनिलकुमार यादव ,स्वाभिमानीचे अनिल मादनाईक ,वंचितचे सुनिल खोत ,बसपाचे आदम मुजावर , अपक्ष प्रमोद पाटील यांचा समावेश आहे. पक्षाचा आदेश पाळत अरुण कडाळे, शिवसेनेचे विजय राऊत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले. उमेदवारी अर्ज माघारीबाबत काही ठिकाणी मनधरणी सुरु होती. आदम मुजावर ( बसपा ), उल्हास पाटील ( शिवसेना), अनिल मादनाईक ( स्वाभिमानी ), अनिलकुमार यादव ( जनसुराज्यशक्ती ), सुनिल खोत ( वंचित), जितेंद्र ठोबंरे ( अपक्ष ), प्रमोद पाटील ( अपक्ष ), राजेंद्र पाटील (अपक्ष), शिवाजी संकपाळ (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
































































