9 महिन्यांची चिमुकली रांगण्याच्या वयात ‘पोहणं’ शिकली! रत्नागिरीची वेदा सरफरे सर्वात लहान जलतरणपटू, इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

9-Month-Old Becomes Youngest Swimmer Enters Indian Record Book

>> दुर्गेश आखाडे, रत्नागिरी

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण या चिमुकलीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही पोहताना. रांगण्याच्या वयात ती पोहू लागली. नऊ महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत पोहचला आहे. 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेंकदात पूर्ण करत वेदा हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरण पटू बनली आहे.

वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. रूद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती त्यावेळी तिच्या पंबरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पहायची. एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. जलतरण तलावाच्या कठडय़ावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो. वेदाला गौरी मिलके प्रशिक्षण देत आहेत.

वेदा पोटात असताना तिची आई पायल रूद्रला जलतरण स्पर्धांना घेऊन जायची. कारवांचीवाडी येथून ती दररोज जलतरणच्या सरावासाठी जलतरण तलावावर घेऊन यायची. ती लहान असतानाही तिला जलतरण तलावावर तिची आई घेऊन यायची, असे वेदाचे वडील परेश यांनी सांगितले.

आशिया बुक आणि गिनिज बुक लक्ष्य

इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर आता वेदा आशिया बुक आणि गिनीज बुकात नाव नोंदवण्यासाठी ती सज्ज झाली असल्याचे वेदाचे वडील परेश सरफरे यांनी सांगितले.