दिव्यात चोरट्याचा विजेवर डल्ला, नऊ हजार युनिट वापरून तीन लाखांची वीजचोरी

बेकायदा इमारत व शाळांचे माहेरघर असलेल्या दिव्यात आता एका चोरट्याने विजेवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरट्याने बेकायदेशीरपणे वीज जोडणी करून वर्षभरात तब्बल नऊ हजार युनिट वापरून जवळपास तीन लाखांची वीजचोरी केली आहे. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अविनाश जोशी याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाकडून शोधमोहीम सुरू असताना त्यांना दिवा पूर्वेतील साबेगाव रोडवर राहणारे अविनाश जोशी यांनी वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी भरारी पथकाने पाहणी केली असता त्यांना वितरण कंपनीच्या फ्युज कटआऊटमधून वीज जोडणी

करून चोरी केल्याचे आढळले. याप्रकरणी चौकशी केली असता अविनाश जोशी हे 2 हजार 950 वॅट लोडचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याने मे 2024 ते मे 2025 दरम्यान 9 हजार 137 युनिटची चोरी केल्याचे उघड झाले. त्यानुसार वितरण कंपनीचे कर्मचारी दीपित चौधरी यांच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी अविनाश विरोधात गुन्हा दाखल केला आहे.