
सामना प्रतिनिधी । चिखली(बुलढाणा)
चिखली येथील 9 वर्षीय बालिकेवर बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या नराधमांची सखोल चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा या इतर मागण्यांचे निवेदन देत घटनेच्या निषेधार्थ सोमवारी समस्त चिखलीकरांनी मुकमोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. या मोर्चात राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, व्यापारी, डॉक्टर, महिला तथा सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तथा नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना चिखलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमध्ये अजुनही काही आरोपी असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे. तसेच चिखली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यासह गुंड प्रवृत्ती वाढीस लागली आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकरणाचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात येवून प्रकरणातील नराधमांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. तसेच पीडित बालिकेवर संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याऐवजी सर्व सुविधांनी युक्त अशा खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात यावेत. याचबरोबर पीडित बालिका व तिच्या कुटुंबीयांचे सुरक्षितते संदर्भात आवश्यक ती पावले उचलुन सदर कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहता त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी या आशयाचे निवेदन चिखलीचे ठाणेदार व तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्या आहे. या निवेदनाच्याप्रती महिला आयोग, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान शहरातील व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी शंभर टक्के बंदला प्रतिसाद दिला असून चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.



























































