इस्रायलला पाठिंबा देऊन स्टारबक्सचे दिवाळे निघाले, अडीच महिन्यांत 91 हजार कोटींचे नुकसान

गेल्या अडीच महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. तसेच कोटय़वधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. या युद्धात हमास आणि इस्रायलची जीवित आणि वित्तहानी झाली आहे. परंतु या युद्धाचा फटका अन्य देशांनाही बसला आहे. इस्रायलला पाठिंबा देणे स्टारबक्सला चांगलेच भोवले आहे. स्टारबक्सला तब्बल 11 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 91 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्टारबक्स ही अमेरिकन कंपनी असून जगभरात कॉफीसाठी प्रसिद्ध आहे.

गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धामुळे जगात दोन गट पडले आहेत. एका गटाने इस्रायलची तर दुसऱया गटाने पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम व्यापारावर होत आहे. अमेरिकन कंपनी स्टारबक्सने उघडपणे इस्रायलची बाजू घेत पाठिंबा दिला होता.

स्टारबक्सने इस्रायलला पाठिंबा म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामुळे जगभरातील मुस्लीम नागरिकांनी स्टारबक्सवर बहिष्कार घातला आहे. याचा जोरदार फटका स्टारबक्सला बसला असून कंपनीचे आतापर्यंत जवळपास 11 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. या कंपनीचे बाजारमूल्य 9.4 टक्क्यांनी घसरले आहे. स्टारबक्सच्या शेअर्समध्ये लागोपाठ घसरण होत आहे.

1992मध्ये कंपनी सार्वजनिक झाल्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. कंपनीचा स्टॉक सध्या जवळपास 95.80 डॉलर प्रतिशेअरवर आहे. जो 115 डॉलरच्या वार्षिक स्तरांपेक्षा खूपच कमी आहे.

दरम्यान, आर्थिक समस्येचे कारण देत स्टारबक्सने इजिप्तमधील आपल्या काही कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱयांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता, असेही बोलले जात आहे.

स्टारबक्स सर्वात मोठी कॉफी हाऊस कंपनी

स्टारबक्स कंपनी ही जगातील सर्वात मोठी कॉफी हाऊस कंपनी आहे. 1971पासून ही कंपनी कार्यरत आहे. स्टारबक्स कंपनी 50हून जास्त देशांत कार्यरत आहे. या कंपनीचे मुख्यालय वॉशिंग्टनच्या सिएटलमध्ये आहे. या कंपनीचे 16 हजार 858 आउटलेट्स आहेत. यातील सर्वाधिक 11 हजार एकटय़ा अमेरिकेत असून कंनडात 1 हजार आणि यूकेमध्ये 700 आउटलेट्स आहेत.