नागपूर, अकोला विधान परिषदेसाठी 98 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अनुक्रमे 98.93 आणि 98.30 टक्के मतदान झाले. या दोन जागांसाठी येत्या 14 तारखेला मतमोजणी होत आहे.

अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, तर काँग्रेसचे छोटू भोयर आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात तिरंगी लढत आहे. काँग्रेसने मतदानाच्या आधी बारा तास भोयर यांच्याऐवजी देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

नागपूर मतदारसंघात 560 मतदार होते. त्यातील 554 (98.93 टक्के) मतदारांनी आपला मताधिकार बजावला. पाच मतदारांनी मतदान केले नाही, तर एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. अकोला-वाशिम-बुलडाणा या मतदारसंघात 822 मतदारांपैकी 808 (98.30 टक्के) मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. तर, नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी आज मतदान  झाले.