२५ टक्के कोट्याच्या तिसर्‍या सोडतीत केवळ ९९८ प्रवेश, ६ ते १८ ऑगस्ट प्रवेश घेण्याची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के कोटा प्रवेशाच्या तिसर्‍या फेरीत केवळ ९९८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला आहे. खासगी शाळेत २५ टक्के कोट्याच्या हजारो जागा रिक्त आहेत. पहिल्या व दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळालेल्या एकूण ५,६२१ विद्यार्थ्यांपैकी २६५२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे २५ टक्के कोटा प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

२५ टक्के कोटा प्रवेशाच्या पहिल्या व दुसर्‍या सोडतीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी शनिवारी तिसरी सोडत जाहीर करण्यात आली. ही सोडत केवळ शाळेपासून तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठीच होती. काही तांत्रिक अडचणींमुळे सोडतीनंतर पालकांच्या मोबाईलवर प्रवेश मिळाल्याचा अथवा न मिळाल्याचा एसएमएस येणार नाही. पालकांनी stunt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑप्लिकेशन व्हाईस डिटेलवर क्लिक करून प्रवेशाची स्थिती पाहावी, असे पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले.

 

अडीच हजार गरीब विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ

कोटा प्रवेशाच्या पहिल्या व दुसर्‍या सोडतीत प्रवेश मिळूनसुद्धा तब्बल २४३० विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे. तर काही त्रुटींमुळे २२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले आहेत.