
राजस्थानात दारू विक्रीचे दुकान मिळवण्यासाठी बेफाम पैसा खर्च केला जात आहे. जवळपास 6 महिन्यांपूर्वी हनुमानगड भागातील दारूविक्रीचे दुकान मिळवण्यासाठी 510 कोटींची बोली लावण्यात आली होती. त्यावेळी ही सर्वाधिक बोली असल्याचं बोललं जात होतं, मात्र या आकड्याला मागे टाकत बोलीचा नवा विक्रम राजस्थानात प्रस्थापित झाला आहे.
कॉम्प्युटरनेही हात टेकले
दौसा येथील एका गावातील दारूविक्रीच्या दुकानासाठी तब्बल 999 कोटींची बोली लावण्यात आली आहे. लिलावात हिस्सा घेणारी मंडळी यापुढेही बोली लावायला तयार होती मात्र कॉम्प्युटरमध्ये यापेक्षा जास्त रकमेची बोली स्वीकारण्याची सुविधा नसल्याने हा लिलाव थांबवण्यात आला.
यापूर्वी लागली होती 510 कोटींची बोली
राजस्थानातील हनुमानगड भागामध्ये दारू विक्रीचं एक दुकान आहे. या दुकानाचा सरकारतर्फे लिलाव करण्यात आला होता. या दुकानासाठी प्रियांका आणि किरण कंवर या दोन महिलांनी 510 कोटींची बोली लावली होती. हा लिलाव या दोघींनी जिंकला खरा, मात्र पैसे न भरल्याने या दोघींना लिलाव प्रक्रियेच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे.
दोघांनी लावली 999 कोटींपेक्षा अधिक रकमेची बोली
दारूच्या दुकानासाठी 510 कोटींची बोली लागल्याने राजस्थानात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र 510 कोटींची रक्कम खुजी वाटावी अशी नवी बोली दौसा जिल्ह्यातल्या साहपूर पाखर गावातील दारूच्या दुकानासाठी लावण्यात आली. या दुकानासाठी 999 कोटी 95 हजार 216 रुपयांची बोली लावण्यात आली. करण सिंह गुर्जर नावाच्या व्यक्तीने ही बोली लावली आहे. याच दुकानासाठी नवलकिशोर मीणा नावाच्या व्यक्तीने 999 कोटी 90 हजार 216 रुपयांची बोली लावली होती. मीणा हे या लिलावामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. गुर्जर आणि मीणा यापुढेही बोली लावण्यासाठी तयार होते मात्र 1 हजार कोटींच्या पुढची रक्कम स्वीकारण्यासाठी कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमध्ये सुविधा नसल्याने लिलाव बंद झाला.
उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अनिल जैन यांनी या लिलावाबाबत बोलताना सांगितलं की करण गुर्जर यांना हे दुकान चालवण्यासाठी दिलं जाण्याला प्राधान्य मिळेल कारण त्यांनी सर्वाधिक बोली लावली आहे. ते असमर्थ ठरल्यास नवल मीणा यांना ही संधी दिली जाईल. जर दोघेहीजण पैसे भरून दुकान चालवायला घेण्यास असमर्थ ठरले तर दोघांना 3 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असे जैन यांनी सांगितले.
या लिलावात भाग घेण्यासाठी 2 लाख 60 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. गुर्जर आणि मीणा हे ब्लॅकलिस्ट झाल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल असेही जैन यांनी सांगितले. या दुकानासाठी बेस प्राईझ म्हणजेच मूळ किंमत ही 1 कोटी 84 लाख 65 हजार ठेवली होती. यापुढे बोलीला सुरुवात झाली, जी 999 कोटींपर्यंत पोहोचली आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.




























































