
सामना प्रतिनिधी । बीड
उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाने स्थगित करण्यात आलेली बीड-धाराशिव-लातूर विधान परिषद निवडणूक प्रक्रिया ११ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. मुख्य निवडणूक आयोगाने निकालाची प्रक्रिया ११ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला निकाल ११ जूनच्या आत लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून सहा जागासाठी २१ मे रोजी निवडणूक झाली. या सहा पैकी पाच जागांचे निकाल जाहीर देखील झाले. मात्र बीड-धाराशिव-लातूर विधान परिषदेचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबवण्यात आला आहे. संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये विविध याचिका दाखल झाल्याने निकालाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता ६ जूनला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी ११ जूनपर्यंत पूर्ण करण्याची सूचना मुख्य निवडणुक आयोगाने दिल्याने अखेर हा निकाल लवकरच लागणार आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाल्याची ती प्रतिष्ठेची बनली होती. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. भाजपाचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे या दोन्ही उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री असल्याने राजकीय विश्लेषक बुचकाळ्यात पडले आहेत.































































