
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या शिफारसीनंतर सहकार खात्याने ही कारवाई केली. या कारवाईमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या कर्ज बुडव्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर कॉंग्रेसचे जयवंतराव जगताप हे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय संपूर्ण संचालक मंडळामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच बॅंकेचे थकबाकीदार आहेत. सहकार खात्याच्या कलम ११० अ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे, तर सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता बँकेमध्ये येऊन देशमुख यांनी बॅंकेचा पदभार घेतला. प्रशासक नेमल्यामुळे जिल्ह्यातील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत. एप्रिल महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली डीसीसी बॅंकेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. कर्ज बुडव्यामध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दीपक साळुंखे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार बबन शिंदे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आदी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश, समाजाचे आपणच तारणहार म्हणून मिरवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मल्ल्या आज निरव मोदीची थकबाकी शासनाने तातडीने कर्ज वसुली करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.































































