निसर्गपूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

येत्या मंगळवारी जागतिक पर्यावरण दिन आहे. निसर्ग हा आपला देव आहे. ईश्वरी तत्त्व हे निसर्गातूनच प्रगटले आहे. यानिमित्ताने ही निसर्गपूजा…

आजच्या सिमेंट काँक्रीटच्या जमान्यात शुद्ध हवा मिळेनाशी झालंय. सगळीकडे प्रदूषणाचे वातावरण आहे. अशावेळी आपले आरोग्य उत्तम राखायचे असल्यास शुद्ध हवा गरजेची आहे. त्यासाठी घरात शोभेची झाडं लावून शुद्ध हवा मिळवता येते. घरात झाडे फक्त शोभेसाठी लावण्यापेक्षा अशीही काही रोपं आहेत, ज्याचा आरोग्याच्या दृष्टीनेही फायदा होतो. ही रोपं लावल्याने घरातील हवा शुद्ध राहायला मदत होते.

नाग वनस्पती
आजकाल घरात विविध प्रकारच्या वनस्पती शोपीस म्हणून ठेवल्या जातात अशावेळी नाग वनस्पती घरी ठेवू शकता. या वनस्पतीसाठी सूर्याच्या प्रखर प्रकाशाची गरज नाही. याची नियमित देखभालही करण्याची गरज नाही. अगदी कमी पाण्यातही ती वाढते. थंडीच्या दिवसात या वनस्पतीला महिन्यातून दोनदा पाणी घातले तरी ती वाळत नाही. विशेष म्हणजे ही वनस्पती घरातील दूषित हवा शुद्ध करण्याचे काम करते. आपण जेथे झोपतो त्या जागी ही वनस्पती ठेवल्यास त्याचा जास्त फायदा होतो. ही वनस्पती रात्री ऑक्सिजन सोडते.

ऐरेका पाम
हे रोप घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी वाढते. विशेष म्हणजे हे रोप घरात ठेवलेले केव्हाही चांगले. शोपीस म्हणून ते घराची शोभा वाढवते, पण आरोग्यासाठीही ते फायद्याचे ठरते. एरेका पाम हवा शुद्ध करण्याचे काम करते. उन्हाळ्याच्या दिवसांत वातावरण थंड आणि ताजेतवाने राहण्यास मदत होते. हे रोप कुंडीत लावता येते. जास्त पाण्याची आवश्यकता नसलेल्या या वनस्पतीला सूर्य प्रकाशाची गरज नाही. हवा शुद्धीकरणाचे काम ते करते. हे रोप कार्बन डायऑक्साइड सोडते आणि त्याला ऑक्सिजनमध्ये रुपांतरीत करून हवेत सोडते. ते हवेतून जायलिन, टोल्युइन ही विषारी वायूंना नष्ट करते. हे रोप घरात शुद्ध आणि ताजीतवानी हवा राखण्यास मदत करते.

स्पायडर प्लांट
कमी प्रकाशाच्या ठिकाणी हे रोप वाढतं. हे रोप कुंडीत लावता येते. हे रोप खिडक्या, साईड टेबल, अंगणात ठेवता येते. बाराही महिने फुल देणारे हे रोप आहे. हे रोप हवेतील फॉर्मेल्डिहाइड, जायलीन, टोल्युइन वगैरे वायूंना हटवून हवा शुद्ध करते. या रोपाला जास्त देखभालीची गरज नाही.

पिस लिली
अनेक मोठ्या कार्यालय आणि बडय़ा हॉटेल्समध्ये हे रोप पाहायला मिळते ते त्याच्या फुलांच्या सौंदर्यामुळे. अमोनिया, फॉर्मेल्डिहाइड, बेंजिन, ट्राएक्लोरोएथिलीन हे घातक वायू नाहिसे करण्यात मदत करते. हवा शुद्ध करण्यासाठी हे रोप वापरले जाते. घरातील हवा शुद्ध करण्यासाठी याची तीन-चार रोपे फार प्रभावी ठरतात. भरपूर जास्त पानं असलेले रोप वातावरणात ऑक्सिजनची मात्रा वाढवते. हे रोप घरातील हवा शुद्ध ठेवते. त्याला जास्त प्रकाशाची आवश्यकता नाही. अशुद्ध वायू खेचून घेऊन हे ऑक्सिजन सोडते. हे रोपटे बेडरुममध्ये ठेवता येते. त्याला पाण्याची जास्त आवश्यकता नाही.

बांबू पाम
दिसायला आकर्षक असणारे हे सुंदर असे शोपीस आहे. हे रोप घरात ठेवायलाही अगदी सोपे आहे. त्याच्यासाठी जास्त देखभालीची आवश्यकता नाही. हे रोप हवेतील विषारी वायू नाहिसे करण्यास मदत करते. बेंझेन, नायट्रोजन ऑक्साइडही घालवते. या रोपटय़ामुळे थंडीच्या दिवसात दमटपणा ठेवण्यास मदत होते. म्हणून बांबू फाम घरात असणे फार चांगले मानले जाते. या झाडामुळे घरात कीडेकीटक येत नाहीत आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. घरातल्या दमटपणावर हे रोप नियंत्रण ठेवते.