जनतेची क्रूर चेष्टा,पेट्रोल स्वस्त फक्त १ पैशाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
petrol-dispencer

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सलग १६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ करणाऱया पेट्रोलियम कंपन्या आणि केंद्र सरकारने बुधवारी चक्क पेट्रोल स्वस्त केले, तेही १ पैशाने. यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने क्रूर चेष्टा चालविली असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे.

सोळा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ३.८० रुपये तर, डिझेल ३.३८ रुपयांनी महागले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर ८६ रुपयांवर गेल्यामुळे जनता त्रस्त आहे. या इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक भडकली असून  महागाईही वाढली आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी सरकारने आज  क्रूर चेष्टा केली.

६० पैसे ही तर तांत्रिक चूक

तेल कंपन्यांनी सकाळी पेट्रोल ६० पैसे आणि डिझेल ५६ पैशांनी स्वस्त केल्याचे जाहीर केले. मात्र, ही ६० पैसे ‘स्वस्ताई’ ही काही ताससुद्धा टिकली नाही. ही तांत्रिक चूक आहे. ६० पैसे नाही, तर पेट्रोल-डिझेलचे दर एका पैशाने कमी झाल्याचे स्पष्टीकरण इंडियन ऑइलने दिले.

हा तर बालिशपणा – राहुल गांधी

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे चॅलेंज मी गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले होते. मात्र, त्यांनी एका पैशाने दर कमी केले. पंतप्रधान अशाचप्रकारे खिल्ली उडविणार असतील तर त्याला बालिशपणाच म्हणावे लागेल, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे चढविला आहे.

केरळमध्ये पेट्रोल-डिझेल २० रुपयांनी स्वस्त होणार

१ जूनपासून पेट्रोल-डिझेलवरील कर रद्द करण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला. केरळमध्ये पेट्रोलवर ३२.०२ टक्के तर डिझेलवर २५.५८ टक्के राज्याचा कर आकारला जातो. कर रद्द झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल तब्बल २० रुपयांनी स्वस्त होऊ शकेल. यामुळे केरळातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.