मुंबईकरांच्या ताटातील भाजी गायब होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेतीविरोधी धोरणाविरुद्ध शेतकरी संपावर गेल्यामुळे दुसऱ्याच दिवशी अनेक शहरांची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल शहरांमध्ये पाठविणे बंद केले. त्यामुळे राजधानी दिल्ली, मुंबई, चंदीगडसह देशभरातील अनेक शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुधाची टंचाई निर्माण झाल्याने दर भडकले आहेत. मुंबईकरांच्या ताटातील भाजीच गायब होईल अशी स्थिती आहे.

१० रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची जुडी ५० तर २० रुपयांना मिळणारी मेथी ४० रुपयांवर गेली आहे, तर टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, गवारने किलोचा दर शंभरी पार केला आहे. पहिल्या दिवशी संपाचा परिणाम फारसा जाणवला नसला तरी मात्र नवी मुंबई आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० टक्के शेतमालाची आवक घटली. भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहकांना घाम फुटला आहे.

शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, दुधाला योग्य दर आदी मागण्यांसाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील बळीराजा संपावर गेला आहे. ऑल इंडिया किसान महासंघाने पुकारलेल्या या आंदोलनात देशभरातील १३० शेतकरी संघटना यात सहभागी झाल्या आहेत. १ ते १० जूनपर्यंत शेतकरी संपावर आहे. संपाच्या दुसऱयाच दिवशी शनिवारी शहरांमध्ये भाजीपाला, फळांची आवक कमी झाली. त्यामुळे टंचाई होऊन दर भडकले.

कल्याण कृषी बाजार समितीत दररोज मोठय़ा प्रमाणात शेतमालाची आवक होते. शेजारच्या गुजरात राज्यासह कर्नाटक, तामीळनाडू येथून नियमित अन्नधान्याची आवक होते. शिवाय शहापूर, मुरबाड, नगर, नाशिक, लासलगाव येथून भाजी, फुले, फळे, कांदा, बटाटा यांची आवक होते. दररोज सरासरी १५० ट्रक, टेम्पो यांच्या माध्यमातून हा शेतमाल बाजार समितीत येतो. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण बाजार समितीत शेतमालाची आवक घटली. २८ ट्रक आणि ७० टेम्पोंमधून शेतमालाची आवक झाली.

सोमवारनंतर मुंबईचे वांदे
मुंबईला वाशी मार्केटमधून अन्नधान्य, भाजीपाला, फळे , कांदा, बटाटा यांचा पुरवठा होतो. दूधही याच मार्गे येते. मुंबई बाजार समितीत शनिवारी आवक फारशी घटली नाही. कांदा-बटाटय़ाचे १३६, भाजीपाल्याचे ५४४, फळांचे ३६०, मसाल्याचे ९३, धान्याचे १९२ असे ट्रक व टेम्पो येऊन दाखल झाले. सोमवारपर्यंत हा साठा पुरेसा आहे. संप जर मिटला नाही तर मात्र मुंबईतील ग्राहकांचे वांदे होऊ शकतात. रोजच्या भाजी, कडधान्य, दुधाअभावी जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना राज्य शासनाने पोलीस बंदोबस्त देण्याचे जाहीर केले आहे. मात्र वाहने फुटली तर शासन जबाबदारी घेणार का, असे म्हणत वाहतूकदारांनी पोलिसांनी बंदोबस्त दिला तरी सोमवारपासून शेतमाल घेऊन येण्यास असमर्थता दर्शवली आहे.

संपाचा परिणाम
– पंजाब, हरयाणातील संपाचा परिणाम राजधानी दिल्लीत झाला. भाज्यांचे भाव दीडपट-दुपटीने भडकले.
– पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी महामार्गावर आंदोलन करून दुधाचे टँकर्स रोखले, भाजीपाला, फळांचे ट्रक रोखून धरले.
– पंजाबमध्ये लुधियाना, फिरोजपूर, भटिंडा, तरनतारनसह अनेक ठिकाणी शेतकऱयांनी आंदोलन केले.
– भटिंडा येथे चार शेतकऱ्यांना अटक केल्यानंतर तणाव वाढला. इतर शेतकऱयांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.
– चंदीगडसह अनेक शहरांमध्ये भाजीपाला, दूध, फळांचे दर कडाडले.
– हरयाणातही शेतकऱयांनी महामार्गावर दुधाचे टँकर, भाजीपाल्याच्या गाडय़ा रोखल्या. शहरांमध्ये आज पुरवठा झाला नसल्याचे आंदोलनाचे निमंत्रक संदीप गिड्डी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री खट्टरही बरळले
शेतकऱयांकडे काही मुद्दाच नाही. विनाकारण दुसऱया गोष्टींकडे लक्ष वेधले जात आहे. शेतमाल विकला नाही तर शेतकऱयांचेच नुकसान आहे, अशी बडबड हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे.

कृषीमंत्र्यांची लायकी समजली – राजू शेट्टी
कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या वक्तव्यावरून त्यांची लायकी समजली आहे. अशा मंत्र्यांना लाथा घालून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल चढविला. वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार शेट्टी यांनी संताप व्यक्त केला.

कृषिमंत्र्यांचे डोके फिरलेय शेतकरी संप ही स्टंटबाजी
शेतकऱयांचे आंदोलन हा तर पब्लिसिटी स्टंट आहे, असे डोके फिरल्यासारखे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केले आहे. पाटणा येथे एका कार्यक्रमात राधामोहन सिंह म्हणाले, देशभरात १२ ते १४ कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत ५०० ते १००० शेतकरी असतील. प्रसारमाध्यमांमध्ये झळकण्यासाठी त्यांना असे काहीतरी करावे लागते. शेतकऱयांचे आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट आहे.