पुन्हा ‘सन’ताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी<<

[email protected]

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे वेगवेगळय़ा विषयांवर लोकजागृती व्हावी यासाठी असे दिवस मुक्रर केलेले असतात. त्यानिमित्ताने त्यावर चर्चा व्हावी आणि त्यातून काही उपयुक्त, ठोस कृतीही घडावी असा त्यामागचा हेतू. १९७१ पासून ‘युनो’ने पर्यावरण दिन पाळण्याचं ठरवलं. ‘आपली एकच पृथ्वी’ असा विचार मांडत या पाणीदार निळय़ा ग्रहाचं सर्वंकष रक्षण, संवर्धन व्हावं यासाठी जगातील सर्व देशांनी, तिथल्या सत्ताधीशांनी आणि जनतेनेही प्रयत्न करावे असा संदेश देण्यात आला. या वर्षीच्या पर्यावरण दिनाचं बोधवाक्य आहे ‘बीट प्लॅस्टिक पोल्यूशन’ किंवा ‘प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घाला’.

‘युनो’च्या अशा अनेक ‘दिनां’चे उद्देश उदात्त असले तरी त्याची अंमलबजावणी क्षीण आणि संथगतीने होताना दिसते. अर्थात नव्याने काही चांगल्या गोष्टींची सुरुवात होते हेही नसे थोडके. प्लॅस्टिकच्या प्रदूषणाबाबत विचार करायचा तर महाराष्ट्राने प्लॅस्टिकबंदीच्या दृष्टीने एक पाऊल टाकलं आहे. प्लॅस्टिकची ‘प्रतिसृष्टी’ निर्माण झाल्यापासून गेल्या अर्धशतकात तिने मानवी जीवन पूर्णपणे व्यापून टाकलं. अक्षरशः ‘जळी, स्थळी, काष्ठाr, पाषाणी’ प्लॅस्टिकचा कचरा दिसू लागला. त्यातच चार महिन्यांचा ‘पावसाळा’ हा परिपूर्ण ऋतू असलेल्या आपल्या देशात तर प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरावर सुरुवातीलाच नियंत्रण येणं गरजेचं होतं, पण एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम जाणवेपर्यंत जाग येत नाही तसं झालं. आता यावर सर्व बाजूंनी विचार होऊन प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करण्याचा निश्चय जनतेनेही केला पाहिजे. कारण लोकसहभागाशिवाय कोणतीही सरकारी योजना खऱया अर्थाने सफल होऊ शकत नाही.

पर्यावरणहानीमधला प्लॅस्टिकचा कचरा हा एक भाग, परंतु इतरही अनेक गोष्टी आहेत. जगभरची बेसुमार  जंगलतोड आणि रासायनिक प्रदूषण असे प्रश्न आ वासून उभे आहेत. केवळ वाहनांच्या धुरातून अतोनात प्रदूषण झाल्याने चीनसारख्या देशातली अनेक शहरं आणि तिथे राहणाऱया लोकांची फुप्फुसं स्वच्छ हवेअभावी काळवंडली आहेत. आता हवेतला कार्बन शोषून त्यापासूनच इंधन वगैरे तयार करता येईल का याचे प्रयोग सुरू आहेत. वैज्ञानिक प्रगतीतून निर्माण झालेल्या आव्हानांना वैज्ञानिक संशोधनातूनच उत्तरं शोधावी लागतील.

क्लायमेट चेंज किंवा बदलतं हवामान हा जगापुढचा एक विक्राळ रूप धारण करणारा प्रश्न आहे. रोजच्या जीवनाशी तो निगडित नाही अशा भ्रमात राहून चालणार नाही. गेल्या काही दिवसांतलं आपल्या राज्यातलं अनेक ठिकाणांचं तापमान त्याचे इशारे देतंय. या वर्षी चंद्रपूरचं तापमान सत्तेचाळीस अंशांच्या वर गेलं. हा उन्हाचा कहर आहे. त्याला ‘नासा’ने इशारा दिल्यानुसार सौरवात, सौरज्वाला अशी कारणे असतीलच. दै. ‘सामना’ने त्याविषयीची दखल घेणारा अग्रलेखही लिहिला. ही सर्व कारणं जाणून त्यासाठी उपाययोजनाही करायला हवी. बदलता पर्यावरणाच्या परिणामांविषयी ‘प्रगत’ म्हणवणारे देश तरी किती जागरूक आहेत हा प्रश्नच आहे. मुख्य म्हणजे गेल्या शे-दीडशे वर्षांतलं बव्हंशी प्रदूषण या देशांच्या प्रगतीचंच फल आहे. यापुढे पर्यावरणाबाबत जागृती करणाऱयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्लोबल वॉर्मिंगचे चटके या उन्हाळय़ातच आपण खूप सहन केलेत. कॅलिफोर्नियात १९१३ मध्ये छपन्न अंश तापमानाची नोंद झाली होती असं म्हटलं जातं. म्हणजे निसर्गाच्या अवकृपेपासून प्रगत देशही मुक्त असू शकत नाहीत.

याचं कारण भूपृष्ठावरची राष्ट्रं वेगवेगळी असली तरी पृथ्वी शेवटी एकसंधच आहे. जगातल्या हवामानाला देशोदेशींच्या मर्यादा नाहीत. महिनाभरापूर्वी राजस्थानकडून आलेल्या धुळीच्या वादळाने पंजाब, दिल्ली भागात कसा धुमाकूळ घातला आणि अनेकांचे बळी गेले ही घटना ताजी आहे. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पन्नास लाख लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागलं ते तिथे आलेल्या चक्रीवादळामुळे. त्यानंतर अनेकदा टेक्सास, कॅलिफोर्निया इत्यादी ठिकाणीही वादळाचे तडाखे बसले.

पर्यावरणाचा एकूण जैविक प्रक्रियेवर काय परिणाम होतो याचा विचार करताना नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित प्रदूषण या सगळय़ांचा एकत्रित अभ्यास करून निष्कर्ष काढावे लागतील. गेल्या शतकभरात लागलेल्या काही सवयी माणसाला बदलाव्या लागतील. पुन्हा एकदा निसर्गस्नेही जीवनाकडे वळावं लागेल.

अर्थातच हे सारं एका रात्रीत होणार नाही, पण त्याची जाणीव झाली तर हळूहळू का होईना बदल घडेल. ‘हे कसलं फॅड आहे’  किंवा ‘मला काय त्याचं?’ म्हणत एकेकाने दुर्लक्ष केलं तर अखेरीस त्याचा त्रास घरापर्यंत येऊन ठेपेल. नव्हे, तसा तो आलाच आहे. वातावरणजन्य प्रदूषकांमुळे नवेच रोग जडताहेत. दम्यापासून त्वचेच्या विकारांचं वाढतं प्रमाण काय सांगतं? निसर्ग त्याच्या पद्धतीने इशारे देतोय. ते समजण्याची कुवत माणसात नक्कीच आहे, मात्र ‘कळतं पण वळत नाही’ अशी स्थिती झालीय.

सिंगापूरमध्ये आहेत तसे कचऱयापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प सर्वत्र व्हायला हवेत. वाया गेलेल्या प्लॅस्टिकचा विधायक वापर करून आणि अनावश्यक, पर्यावरणघातकी प्लॅस्टिकचा वापर थांबवून वातावरण स्वच्छ करायला हवं. कार्बनने काळवंडलेलं आकाश मोकळं करायचं असेल तर तो शोषून त्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचं ऊर्जेत वगैरे रूपांतर होऊ शकेल का अशा प्रकारच्या संशोधनाला चालना द्यावी लागेल. तसे प्रयत्न करणाऱयांना सरकारदरबारी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. कारण बिघडतं पर्यावरण आणि बिनसतं हवामान हा कुणा एकाचा प्रश्न नाही. तो सर्व सजीवांचा आहे. त्यावर उपाय शोधणं मात्र केवळ माणसाच्या हाती आहे. तो माणसाचा नैतिक अधिकार आहे आणि कर्तव्यसुद्धा.