
>> सामना प्रतिनिधी
श्रीकृष्ण चरित्राला आधुनिकतेची आगळीवेगळी कलाटणी देणारे ‘जय श्रीकृष्णा’ हे नाटक सध्या रंगभूमीवर सादर होत आहे. गाणी, श्लोक, नृत्य या माध्यमांद्वारे श्रीकृष्ण प्रेक्षकांशी संवाद साधत उलगडत जातो. प्रत्येकाच्या मनात असलेली श्रीकृष्णाची छबी बॅले नृत्याद्वारे पाहण्याचा आनंद मिळवण्यासाठी रसिकांनी हे महानाटय़ जरूर पाहावे असेच झाले आहे. हे नाटक जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं यासाठी ते हिंदीत सादर होतंय. परदेशातील प्रेक्षकही या नाटकाची मागणी करत आहेत.
हे नृत्य-नाटय़ असून कृष्ण जन्म ते कृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता इथपर्यंतचा प्रवास यामध्ये गुंफण्यात आला आहे. यामध्ये वेगळ्या पद्धतीने रंगवलेले कृष्णाचे पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळते. कृष्णलीला सगळ्यांना ऐकायला आवडतात,मात्र त्याने त्याच्या आयुष्यात ज्या दृष्टिकोनातून विविध मोहिमा राबवल्या त्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना मारून एकसंघ भारत उभा करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. म्हणून महाभारत आणि त्याचं कर्तृत्व यावर हे नाटय़ रसिकांना विचार करायला प्रवृत्त करतं, अशी माहिती नाटकाचे दिग्दर्शक रघुवीर कुलकर्णी देतात.
विवेक आपटे लिखित या कलाकृतीतील बॅले नृत्याचे दिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी केले आहे. तसेच नर्तक नकुल घाणेकर याने या बॅलेत महाभारतातील कृष्णाची व्यक्तिरेखा साकारली असून निनाद लिमये यांनी आधुनिक युगातील श्रीकृष्णाचे मनोगत व्यक्त केले आहे.
– कृष्णावरील ३५ गाणी
बरेचसे कवी, गीतकार, संत यांनी कृष्णावर आधारित गाणी लिहिली आहेत. तसेच जुन्या हिंदी चित्रपटातही कृष्णाची बरीचशी गाणी आहेत. यापैकी ३५ गाण्यांचा या नृत्य-नाटय़ात समावेश करण्यात आलेला आहे, हे या नृत्य-नाटय़ाचे अनोखे वैशिष्टय़. तसेच ‘फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा’ या आणि इतर कृष्णाने दिलल्या संदेशावर यातील नाटय़कलाकृती पुढे सरकत जाते.
-नव्या पिढीसाठी…
श्रीकृष्णाचे नंदाघरी गेलेले बालपण, राधेचे प्रेम, युद्धाचा आग्रह, कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता, त्याने वेळोवेळी घेतलेले निर्णय, भूमिका अशा त्याच्या अनेक रूपांविषयी तो या नाटय़ातून आपले मनोगत व्यक्त करतो. त्यामुळे कृष्ण चरित्राचा एक नवा दृष्टिकोन आणि नृत्य-नाटय़ाचा आनंद मिळवण्यासाठी नव्या पिढीने हे नाटक पाहावे. ‘जय श्रीकृष्णा’मधील श्रवणीय गोष्टींचा परिणाम आणि पूर्वी न ऐकलेली गाणी यांचं नावीन्य तरुणांना अनुभवता येईल असे
मतही ते व्यक्त करतात.























































