शोल्डर पर्समधून परदेशी चलनाची तस्करी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

शोल्डर पर्समध्ये ५० हजार अमेरिकन डॉलर लपवून दुबईला पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा प्रवासी महिलांना कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर रंगेहाथ पकडले. दोघींकडून एक लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त केले असून त्याची हिंदुस्थानी किंमत ६६ लाख ९५ हजार इतकी आहे.

फादवा अबदेलरझिझ ओसमन मोहम्मद आणि नशवा आदम इल्कथीम अशी त्या दोघा प्रवासी महिलांची नावे आहेत. दोघीही इंडिगो विमानाने दुबईला जाण्यासाठी मुंबईच्या छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या होत्या, परंतु त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघींना थांबवून त्यांच्या सामानाची तपासणी केली. तेव्हा दोघींच्या शोल्डर पर्समध्ये प्रत्येकी ५० हजार अमेरिकन डॉलर सापडले. दोघींना पकडून त्यांच्याकडील परदेशी चलन हस्तगत केल्याचे कस्टमचे उपायुक्त प्रशांतकुमार यांनी सांगितले.

सोन्याची तस्करी पकडली

दुबईहून जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईत आलेल्या शेख झुल्केरनेन झुल्फीकर अली या प्रवाशाला सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३४ लाख ५१ हजार किमतीचे सोन्याचे प्लेट जप्त केले. १२०० ग्रॅम वजनाचे ते सोने असून २४ कॅरेटचे आहे. अली कस्टमच्या ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडला होता. तो विमानतळाबाहेर पडणार तेवढय़ात अधिकाऱ्यांनी त्याला पकडले.